योगी आदित्यनाथांनी स्विकारले ओवेसी यांचे आव्हान


लखनौ – 2022 अर्थात पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा आदमास घेण्यास सुरूवात केली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी सध्या वाढल्या आहेत. भाजपमध्ये योगीच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होत असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री योगींना आव्हान दिले आहे. पुन्हा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे ओवेसी यांनी म्हटले असून, ओवेसी यांचे आव्हान योगी आदित्यनाथांनी स्वीकारले आहे. योगींनी यावर आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना भूमिका मांडली.

एमआयएमने बिहारमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर आता इतर राज्यांमध्येही विस्तार करताना दिसत आहे. आता एमआयएम उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीतही मैदानात उतरणार आहे. यासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी मोर्चबांधणी सुरू केली असून, एका रॅलीमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल वक्तव्य केले होते. योगी आदित्यनाथ यांना पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे ओवेसी म्हणाले होते. ओवेसींनी दिलेल्या आव्हानाला योगींनी उत्तर दिले आहे.

योगी आदित्यनाथ ओवेसींनी केलेल्या विधानावर बोलताना म्हणाले, भाजपचेच सरकार उत्तर प्रदेशात बनणार असून ओवेसी हे देशातील मोठे नेते आहेत. ते देशभर प्रचार करत असतात. त्यांना एका समुदायाचा मोठा पाठिंबा आहे, पण उत्तर प्रदेशात ओवेसी हे भाजपला आव्हान देऊ शकत नाही. आपले मुद्दे आणि मूल्ये घेऊन भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारतो, असा पलटवार योगी आदित्यनाथ यांनी ओवेसींवर केला.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम शंभर जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रियाही एमआयएमने सुरू केली आहे. याबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करून माहिती दिली होती. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीबद्दल काही मुद्दे मांडत आहे. शंभर जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने उमेदवार निवड प्रक्रिया सुरू केली आहे. आमची आघाडीसंदर्भात कोणत्याही पक्षांशी चर्चा झाली नसल्याचेही, असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले होते.