कुस्तीपटू सुशील कुमारने केली तिहार जेलमधील सेलमध्ये टीव्ही बसवण्याची मागणी !


नवी दिल्ली – सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये असलेला भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याने आता नवी मागणी केली आहे. तिहार जेलमधील त्याच्या बरॅकमध्ये सुशील कुमारला टीव्ही हवा आहे. यासंदर्भातील माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनीच दिली आहे. दिल्ली न्यायालयाने नुकतीच, सुशील कुमारची विशेष जेवण आणि कुस्तीपटूचा आहार मिळण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर त्याने आता टीव्हीची मागणी केली आहे. कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी माहिती होण्यासाठी टीव्ही हवा असल्याचे यावेळी सुशील कुमारने आपल्या अर्जात म्हटले आहे. त्याने हा अर्ज तुरुंग प्रशासनाला आपल्या वकिलाकरवी दिला आहे.

नुकतीच दिल्ली विशेष न्यायालयाकडे सुशील कुमारने एक मागणी केली होती. त्यानुसार आपले कुस्तीपटू म्हणून करिअर पुढेही सुरू ठेवण्यासाठी तुरुंगात आपल्याला कुस्तीपटूसाठीचा आहार मिळण्याची विनंती करण्यात आली होती. यामध्ये प्रोटीन देणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स, ओमेगा-३ कॅप्सुल्स, जॉइंटमेंट कॅप्सुल्स, प्रि-वर्कआऊट सी-४, मल्टिव्हिटॅमिन जीएनसी आणि एक्सरसाईज बँड यांचा समावेश होता. पण न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने नवी मागणी केली आहे.

यासंदर्भातील माहिती तिहार तुरुंगाचे डीजी (महासंचालक) संदीप गोयल यांनी दिली आहे. सुशील कुमारने आपल्या वकिलांमार्फत अशी विनंती केली आहे की त्याला बरॅकमध्ये टीव्ही हवा आहे. त्याने शुक्रवारी यासंदर्भातील अर्ज दिला आहे. तुरुंगाबाहेर आणि विशेषत: कुस्तीविश्वात काय घडत आहे, याविषयीची माहिती मिळण्यासाठी त्याने टीव्हीची मागणी केल्याचे गोयल म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुशील कुमार याला मांडोली तुरुंगातून तिहार जेलच्या बरॅक नंबर २ मध्ये हलवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सुशील कुमार याला स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे. तिहारमध्ये हलवताना मांडोली जेलबाहेर काही पोलीस अधिकाऱ्यांना सुशील कुमारसोबत सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. हे प्रकरण या पोलीस अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले असून त्याची विभागांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.