कोरोना नियमावलीचे पालन न केल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान कोरोनाची तिसऱ्या लाट शिगेला पोहोचू शकते!


नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कोरोनाची संभाव्य तिसरी लाट शिगेला पोहोचू शकते, असा इशारा कोरोनाच्या रोगाशी संबंधित सरकारच्या पॅनेलमध्ये सामील वैज्ञानिक, प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी दिला आहे. या पॅनेलवर कोरोनाच्या मॉडलिंग करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटले की, तिसऱ्या लाटेत दररोज रुग्णसंख्या तुलनेने कमी असेल, पण जर नवीन कोरोना स्ट्रेन आला तर तिसऱ्या लाटेदरम्यान संसर्ग झपाट्याने पसरू शकतो. प्राध्यापक अग्रवाल यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम्ही तीन सिनेरियो तयार केले आहेत. एक आशावादी आहे. यात आमचा विश्वास आहे की ऑगस्टपर्यंत जीवन सामान्य होईल आणि नवीन कोणताही म्युटेंट तयार होणार नाही. दुसरा ज्यात आम्ही असे मानतो की लसीकरण 20% कमी प्रभावी आहे. आणि तिसऱ्यात आम्ही मानतो की, नवीन व्हेरिएंट येऊ शकतो आणि ज्यामुळे 25 टक्के जास्त प्रसार होईल. पण तो डेल्टा प्लस व्हेरिएंट नसेल असेही त्यांनी सांगितले.

जर वेगवान प्रसार करणारा कोणता व्हेरिएंट नसेल तर तिसरी लाट कमकुवत होईल आणि जर असा व्हेरिएंट असेल तर तिसरी लाट आधीच्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक असेल, असे प्रा. अग्रवाह यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मॅथेमॅटिकल मॉडेल्सचा वापर करून कोरोना व्हायरस केसेसमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यासाठी एक सरकारी समिती नेमली होती. यामध्ये प्रा. मनिंद्र अग्रवाल, एम.विद्यासागर, लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर इत्यादी सदस्य आहेत. कोरोनाच्या मार्च-एप्रिलमधील दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज न लावल्याबद्दल समितीवर टीका झाली होती. देशात 7 मे रोजी 4 लाख 14 हजार 188 रुग्ण आढळले होते, ही आजवरची सर्वोच्च संख्या आहे.