कोणाच्या भावना दुखावू नयेत म्हणून चित्रपटाचे नाव बदलणार समीर विद्वांस!


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस याने काही दिवसांपूर्वीच समीरने ‘सत्यनारायण की कथा’ या नव्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा केली होती. अभिनेता कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण या चित्रपटाचे नाव आता बदलण्यात आले आहे.


आगामी चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’चे नाव बदलणार असल्याचे समीर विद्वांसने ट्वीट करत सांगितले आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही आगामी चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या नावामुळे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. यासाठी निर्मात्यांनी आणि क्रिएटीव्ह टीमने पाठींबा दिला आहे. या चित्रपटाच्या नव्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे देखील त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन समीरच्या या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तत्पूर्वी ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटांचे समीरने दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच त्याची ‘समांतर २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनने देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.