उद्या Amazonचे सीईओ पद सोडणार Jeff Bezos; जाणून घ्या काय आहे त्यांची पुढील योजना?


नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनची (Amazon) एका ऑनलाइन बुकस्टोअरच्या स्वरुपात सुरूवात केल्यानंतर आणि ऑनलाईन बाजारपेठेच्या दुनियेत अ‍ॅमेझॉनची वेगळी ओळख निर्माण करणारे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे अ‍ॅमेझॉन कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. ते उद्या म्हणजेच 5 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्यामुळे जेफ बेझोस यांची जागा आता अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्यूटिंग बिझनेसचे संचालन करणारे अँडी जेसी घेणार आहेत.

दरम्यान, जेफ बेझोस जवळपास 30 वर्षे मुख्य सीईओ पदावर राहिल्यानंतर आता कार्यकारी अध्यक्षपदाच्या नव्या भूमिकेत असतील. फेब्रुवारीच्या सुरूवातीला जेफ बेझोस यांनी इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि त्यांची कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अ‍ॅमेझॉनचे सीईओ पद सोडत असल्याचे सांगितले होते.

त्याचबरोबर सध्या आपल्या नवीन सेक्टरवर जेफ बेझोस फोकस करत आहेत. आता स्पेस फ्लाइट मिशनवर बेझोस काम करत आहेत. ते त्यांची कंपनी ब्लू ओरिजिन द्वारे या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या स्पेस फ्लाइटमधून उड्डाण घेणार आहेत.

इन्स्टाग्रामवर जेफ बेझोस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, त्यांचे भाऊ आणि लिलावातील एक विजेता ब्लू ओरिजिनच्या ‘न्यू शेफर्ड’ अंतराळयानामध्ये 20 जुलै रोजी उड्डाण घेणार आहेत. या अंतरावारीमध्ये टेक्सास ते अवकाशात संक्षिप्त प्रवास केला जाणार आहे. अपोलो 11 च्या चंद्रावर आगमन झाल्याचा वर्धापनदिन 20 जुलै रोजी साजरा केला जातो.

अंतराळातून पृथ्वीला पाहणे, तुम्हाला बदलून टाकते, या ग्रहाशी तुमचे नाते बदलून टाकते. या फ्लाइटमध्ये मी चढू इच्छित आहे, कारण ही अशी एक गोष्ट आहे. जी मला नेहमी करायची इच्छा होती. हा एक थरार आहे. माझ्यासाठी हे खूप महत्वाचे असल्याचे जेफ बेझोस यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले होते.