आयसीएमआरचा खुलासा; कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतरही Delta Varient विरोधात अँटिबॉडी नाही


नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स अर्थात आयसीएमआरच्या एका अभ्यासातून कोव्हिशिल्ड लसीचा एक डोस घेतल्यानंतर 58.1 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात अँटिबॉडी तयार होऊ शकल्या नाहीत, तर या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 16.1 टक्के लोकांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख असलेले डॉ. टी जेकब यांनी सांगितलं की, अँटिबॉडी न दिसणे आणि तयार न होणे या गोष्टी एकच नाहीत. यामध्ये न्यूट्रलायजिंग अँटिबॉडीचा स्तर हा कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात येत नाही. पण अशा अँटिबॉडी शरीरात असू शकतात आणि त्यामुळे गंभीर लक्षणांपासून संरक्षण होऊ शकते.

न्यूट्रलायजिंग अँटिबॉडीच्या ट्रायट्रेस या विशेष रुपातील Sars-CoV-2 व्हायरसच्या विरोधात मारा करतात आणि त्याला मानवी शरीरातील कोशिकांमध्ये प्रवेश करण्यास अडथळा आणतात. न्यूट्रलायजिंग अँटिबॉडीच्या ट्रायट्रेस या B1 व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटमध्ये कमी आहेत. भारतात B1 व्हेरिएंटमुळे कोरोनाची पहिली लाट आली होती. B1 व्हेरिएंटच्या तुलनेत न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी ट्रायट्रेस या लसीचा पहिला डोस घेणाऱ्यामध्ये 78 टक्के कमी तर दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये 69 टक्के कमी होत्या.

या व्यतिरिक्त संक्रमित झालेल्या आणि लसीचा डोस न घेतलेल्या लोकांमध्ये न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी ट्रायट्रेस 66 टक्के कमी सापडल्या. तसेच ज्या लोकांना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्या शरीरात न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी ट्रायट्रेस या 38 टक्क्यांनी कमी होत्या. आयसीएमआरच्या या अभ्यासातून असे स्पष्ट होते की भारतातील लसीकरण अभियानात काही लोकांना कोव्हिशिल्डच्या अतिरिक्त बूस्टर डोसची आवश्यकता पडू शकते. ज्या लोकांना या आधी कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना केवळ एकच डोस घेतला तरी पुरेसा आहे.