मिताली राजने रचला इतिहास; बनली महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज


भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने इंग्लंडच्या विरोधात खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इतिहास रचला आहे. 75 धावांची नाबाद खेळी करणारी मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज बनली आहे. त्याचबरोबर सलग तिसरे अर्धशतक झळकवत मिताली राजने भारतीय महिला क्रिकेट संघाला चार विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.

आपल्या या खेळीत 38 वर्षांची मिताली 11 धावा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. इंग्लंडच्या चार्लोट एडवडर्सला मितालीने मागे टाकले आहे. चार्लोट एडवडर्सच्या नावे 10273 धावांचा विक्रम आहे. आपल्या या विक्रमासह मिताली राज क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. या यादीत न्यूझीलंडची सूजी बेट्स 7849 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.

मिताली राजने इंग्लंडच्या विरोधात खेळवण्यात आलेल्या मालिकेमध्ये उत्कृष्ट खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिनही सामन्यांमध्ये मिताली राजने अर्धशतक झळकवले आहे. संपूर्ण मालिकेदरम्यान, मिताली राज एका वळणावर अत्यंत मजबुतीने उभी राहिली.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिताली राजने 72 धावा केल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये मिताली राजने 59 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 75 धावांची खेळी करुन संघाचा क्लीन स्वीप होण्यापासून बचाव केला आहे. मिताली राज या मालिकेमधील सर्वाधिक धावा, सर्वाधिक अर्धशतके आणि सर्वाधिक चौकार लगावणारी खेळाडू आहे.