दिलासादायक! देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत आहे मोठी घट


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने घट होत असल्याचे दिलासादायक चित्र सध्या दिसत आहे. 27 जूनपासून सलग 50 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 43,071 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी शुक्रवारी 44,111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 52,299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले आहेत.

देशात सलग 52व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशभरात 3 जुलैपर्यंत 35 कोटी 12 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले होते. काल दिवसभरात 67 लाख 87 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 42 कोटी कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 18 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्के आहे.

देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्ण 2 टक्क्यांहून कमी आहेत. भारताचा कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत तिसरा क्रमांक आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

तर महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर 9,489 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 17 हजारांच्या वर आहेत. काल मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1289 तर कोल्हापूर शहरात 376 असे एकूण 1665 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 38 शहरे आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,23,20,880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,88,841 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,949 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 4,422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचा आकडा काही दिवसांपासून रोजचा हजाराच्या आता येत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 575 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,97,991 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,297 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 752 दिवसांवर गेला आहे.