कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 29 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू


मदुराई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोना लसीकरणाची मोहिम वेगाने राबवण्यात येत आहे. पण असे होत असतानाच सीरमची कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 तासाच्या आत सरकारी राजाजी रुग्णालयात जात असताना 29 वर्षीय इंजिनिअर तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव डी अँड्र्यू सायमन असे असून तो न्यू विलांगुडी येथे राहत होता. तो युकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता आणि गेल्या ऑगस्टमध्ये तो मदुराईला आपल्या मूळ गावी परतला होता. गावी परत आल्यापासून तो वर्क फ्रॉम होम करत होता.

याबाबत त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, सायमनने नोकरी बदलली होती. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून तो बेंगळुरूस्थित कंपनीत रुजू झाला होता. त्याचे काम घरुन चालायचे आणि तीन महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास सायमन आणि त्याची पत्नी सत्यमूर्ती नगर येथील सम्यनाल्लूर ब्लॉक प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. तिथे त्या दोघांनी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. रात्री दोघांनाही अंगदुखी सुरु होती. पण सायमन सकाळी बाथरुममध्ये गेला असता तेथेच कोसळला, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. जवळच्या खासगी रुग्णालयाने त्याला दाखल करण्यास नकार दिल्यामुळे त्याला तातडीने जीआरएच येथे दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ केव्ही अर्जुन कुमार यांनी सांगितले की, लसीकरणानंतरच्या प्रतिक्षा केंद्राच्या निरीक्षणामध्ये असताना लसीवर तत्काळ immediate allergic प्रतिक्रिया आल्याचा पुरावा नाही आहे.