सर्वांगसुंदर सूर्यनमस्कार, फायदे आणि तोटे


आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात असून पंतप्रधान मोदी आज रांची येथे ४० हजार लोकांच्या समवेत योगासाने करणार आहेत. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता मिळवून देण्यात पंतप्रधान मोदी यांचे मोठे योगदान आहे. योगसाधना ही सातत्याने करावयाची साधना आहे मात्र अनेकांना रोजच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे त्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. अश्यांसाठी सूर्यनमस्कार हा आदर्श योग ठरू शकतो. दिवसातली सकाळची फक्त १५ मिनिटे त्यासाठी पुरेशी असतात आणि यामुळे दिवसाची सुरवात नवी उर्जा आणि स्फूर्तीने करणे शक्य होते.

सूर्यनमस्कार नियमाने घातले तर मन शरीर शुद्ध होतेच पण शक्तिशाली आणि शांत बनते. यात शरीराचे अनेक आजार बरे करण्याची ताकद आहे आणि सूर्यनमस्कार घालण्यासाठी कोणत्याही अन्य साधनांची आवश्यकता नाही त्यामुळे ते कुठेही घालता येतात. या एकाच आसनात अनेक आसने केली जातात आणि दिवसाकाठी फक्त १५ मिनिटे खर्च केली तर संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो, मानसिक शांती मिळते.


सूर्यनमस्कार नियमाने घातले तर त्याचे अनेक फायदे आहेत. वजन जास्त असलेल्या लोकांनी नियमाने सूर्यनमस्कार घातले तर हळूहळू वजन आटोक्यात येऊ लागते. यामुळे शरीर अधिक लवचिक बनते आणि शरीराच्या हालचाली अधिक सुलभपणे होतात. पोटाचे स्नानु मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते आणि मेंदू शांत राहिल्याने आळस दूर होतो. या व्यायामाने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो, रक्तदाब नियंत्रणात येतो, केस गळणे, कोंडा होणे, अवेळी पांढरे होणे अश्या समस्या दूर होतात. ज्यांना राग चटकन येतो त्यांना त्यावर सूर्यनमस्कार घालून नियंत्रण मिळविता येते.

सूर्यप्रकाशात हे नमस्कार घातले तर शरीराला नैसर्गिकरीत्या ड जीवनसत्व मिळते आणि त्यामुळे हाडे बळकट होतात. डोळे तेज होतात. त्वचा रोगांवर सूर्यनमस्कार रामबाण ठरतात. सूर्यनमस्कार घालताना ते पूर्वेकडे तोंड करून घालावेत आणि प्रत्येक क्रिया ध्यानपूर्वक करावी. घाईगडबडीने सूर्य नमस्कार घालू नयेत.


ज्यांना स्लीप डिस्कचा त्रास होतो त्यांनी सूर्यनमस्कारातील ३ री व ५ वी पोझ करू नये. अन्य काही सांधे व्याधी असतील, हृदयरोग असेल किंवा गंभीर आजार असले तर त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेऊन मग सूर्यनमस्कार घालावेत. तसेच योगतज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. सूर्यनमस्कार विविध पद्धतीने घालता येतात त्यातील आपल्याला सोयीचे आणि योग्य कोणते याची माहिती घेऊन मगच ते घालावेत.

Leave a Comment