NASAच्या Mission Artemis मध्ये महत्वपूर्ण जबाबदारी बजावत आहेत भारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर


भारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर या नासाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मिशन अर्टिमिस’मध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. या मिशन आर्टिमिसमध्ये सुहासिनी अय्यर रॉकेटच्या कोअर स्टेजचे कामकाज पाहत असून या मिशनच्या त्या बॅकबोन असल्याचे सांगण्यात येते. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट असून त्यामुळे अंतराळ क्षेत्राच्या विकासामध्ये भारतीयांनी आपला दबदबा कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अर्टिमिस-1 च्या लॉन्च इंटिग्रेटेड प्रोडक्ट टीमचे भारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर नेतृत्व करत आहेत. त्यामध्ये या मिशनसाठी लागणाऱ्या विविध घटकांची निर्मिती केली जात आहे. कोईम्बतूरमध्ये मूळच्या भारतीय असलेल्या सुहासिनी अय्यर यांचा जन्म झाला. 1992 साली त्यानी व्हीएलबी जानकीमल महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. अशी पदवी घेतलेल्या त्या महाविद्यालयाच्या पहिल्याच महिला होत्या. नासाच्या मून मिशन स्पेसच्या लॉन्च सिस्टिम म्हणजे एसएलसी प्रोजेक्टवर त्या गेली दोन वर्षे काम करत आहेत.

चंद्रावर आर्टिमिस-1 च्या माध्यमातून ओरियन स्पेसक्राफ्ट हे मानवरहित यान जाणार आहे. ओरियन पृथ्वीपासून जवळपास साडे चार लाख किलोमीटरचा प्रवास करणार असून तो चंद्राच्या कक्षेच्या पलिकडचा असेल. तीन आठवड्यांचे नासाचे हे मिशन असेल. ओरियन यान हे चंद्रावर आणि त्याच्या कक्षेबाहेरही प्रवास करेल आणि त्या ठिकाणची विविध माहिती पृथ्वीवर पाठवेल. नासाचे हे ओरियन यान 2024 साली चंद्रावर उतरवण्यात येणार आहे. नासाच्या या मिशनच्या माध्यमातून एक महिला आणि एक पुरुषाला चंद्रावर पाठवण्यात येणार आहे.