पैसे नसतानाही रिलायन्स जिओच्या ग्राहकांना करता येणार रिचार्ज


टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने टाळे लावण्याची वेळ आणली आहे. रिलायन्स जिओचे नेटवर्क देशभरात सर्वाधिक लोक वापरत आहेत. सध्या बाजारात काही ठराविक कंपन्या आहेत, ज्या जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. रिलायन्स जिओ याच पार्श्वूभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी योजना घेऊन बाजारात उतरली आहे. त्यानुसार, ग्राहकांना पैसे नसतानाही रिचार्ज करता येणार आहे. या योजनेला ‘इमरजेंसी डेटा लोन’ असे नाव देण्यात आले आहे. माहितीनुसार, काही ग्राहकांना विविध कारणांमुळे त्वरित रिचार्ज करता येत नसल्यामुळे ही योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

अशा जिओ ग्राहकांसाठी ही सुविधा आहे ज्यांचा दैनिक डेटा कोटा संपला आहे. परंतु, ते त्वरित डेटा रीचार्ज करू शकत नाहीत, अशा ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, ग्राहकांना या रिचार्जचे पैसे नंतर द्यावे लागणार आहे. या सुविधेअंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना एक जीबीचे (प्रत्येक) पाच आपत्कालीन डेटा कर्ज पॅक प्रदान करेल. प्रत्येक पॅकची किंमत 11 रुपये असेल. या आपत्कालीन डेटा कर्जाची सुविधा माय जिओ अ‍ॅपद्वारे मिळू शकते. या सुविधेमुळे ग्राहकांना एक सोपा अजून चांगला तोडगा मिळेल, असे सूत्रांनी सांगितले आहे.