पतिचे पार्थिव उचलल्यामुळे ट्रोल झाली मंदिरा बेदी; सोना मोहपात्राने केला बचाव


अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला मंदिराने खांदा दिला होता. त्याचबरोबर तिने राज यांच्या अंतिम संस्कारावेळी काही विधीदेखील केले होते. आपल्या कृतीमधून मंदिराने अनेक वर्षाच्या परंपरा मोडल्या. मंदिराने दुःख असूनही कणखरपणे पत्नीधर्म निभावल्यामुळे अनेकांनी तिला पाठिंबा दिला. पण तिच्या या कृत्याला काहीजणांनी विरोध करत सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मंदिराला ट्रोल करणाऱ्यांना गायिका सोना मोहपात्राने सणसणीत उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.


पती राज कौशल यांच्या अंत्यसंस्कारावेळी मंदिरा बेदीने पांढरा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. मंदिराला त्यावरूनही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. अशा या ट्रोल करणाऱ्यांना सोना मोहपात्राने एक ट्वीट करत खडे बोल सुनावले. सोनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, काही लोक अजूनही मंदिरा बेदीने पती राज कौशल यांच्या अंतिम संस्कार प्रसंगी घातलेल्या कपड्यांवरून ट्रोल करत आहेत. याचे मला जराही आश्चर्य वाटले नाही, शेवटी आपल्या देशात इतर गोष्टींपेक्षा मुर्खांचे प्रमाणच जास्त आहे. दरम्यान सोना मोहपात्राने व्यक्त केलेल्या मताचे अनेकांनी समर्थन केले आहे.

बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला. राज कौशल हे ४९ वर्षांचे होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्यावेळी अभिनेता रोनित रॉय, त्याची पत्नी निलम सिंह, मानसी जोशी रॉय, समीर सोनी आणि आशिष चौधरीसह अन्य कलाकार मंडळी उपस्थित होते.