पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटल्यामुळे जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद


पुणे: काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यातील परिस्थिती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. कारण, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटल्यामुळे सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्यादृष्टीने हे चांगले लक्षण मानले जात आहे.

जम्बो सेंटरमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण 3009 रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी 1909 जण बरे होऊन घरी परतले होते. तर 654 जणांचा मृत्यू झाला होता. हे जम्बो कोव्हिड सेंटर गरज पडल्यास पुन्हा कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

दरम्यान पुणे महानगरपालिकेने आगामी काळात कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे. महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. गुरुवारपासून लसीच्या उपलब्धतेनुसार ही मोहिम राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.