मुंबई : मुलांमधील सर्वेक्षणानंतर १५ जुलैपासून मुंबईत आता सेरो सर्वेक्षणाची पाचवी फेरी सुरू होणार आहे. यात शहरातील बालके वगळता सर्व वयोगटांतील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किती टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिपिंडे तयार झाली आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता सेरो सर्वेक्षणाची पाचवी फेरी राबविणार आहे. तिसऱ्या फेरीप्रमाणेच मुंबईतील २४ विभागांमध्ये ही फेरी राबविण्यात येणार आहे. बालकांचे सर्वेक्षण झाल्यामुळे त्यांचा यात समावेश केला जाणार नाही. या व्यतिरिक्त सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश यात करण्यात येणार आहे.
१५ जुलैपासून ‘सेरो सर्वेक्षणा’ची मुंबईत पाचवी फेरी
प्रत्येक विभागातून १५० असे सुमारे चार हजार नमुने या सर्वेक्षणात घेण्यात येतील. १५ जुलैपासून ही फेरी सुरू होणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. बालकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये अधिक धोका असल्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने नुकतेच चौथ्या फेरीमध्ये बालकांचे सेरो सर्वेक्षण केले. यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक बालकांमध्ये प्रतिपिंडे असल्याचे आढळले.
मुंबईत ८० टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित होऊन गेली असल्याची शक्यता टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या अभ्यासात वर्तविण्यात आल्यामुळे तिसरी लाट आली, तरी त्याची तीव्रता दुसऱ्या लाटेएवढी नसेल, असा अंदाजही या अभ्यासात व्यक्त केला आहे. शहरात पहिल्या लाटेमध्ये झोपडपट्टी भागात कोरोनाचा उद्रेक मोठय़ा प्रमाणात झाला होता, तर दुसऱ्या लाटेमध्ये बिगरझोपडपट्टी भागात संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळे आता झोपडपट्टी भागातील प्रतिपिंडाचे प्रमाण कमी झाल्याची शक्यता आहे.