काल दिवसभरात 44,111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 738 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यातच देशात दररोज जवळपास 50 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, 27 जूनपासून सलग 50 हजारांहून कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 44,111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 57,477 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सलग 51व्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. 2 जुलैपर्यंत देशभरात 34 कोटी 50 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 50 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 41.64 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल्स तपासण्यात आले आहेत. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.

तसेच महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल (शुक्रवारी) 8,385 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 16 हजारांच्या जवळ आल्या आहेत. विशेष म्हणजे काल मालेगाव आणि नंदुरबारमध्ये एकही कोरोनाबाधिताची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर आज राज्यातील 34 शहरे आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत 58,36,920 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 156 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,16,867 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गेल्या 24 तासात 676 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. तर 546 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,97,140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात 27 रुग्णांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,598 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 744 दिवसांवर गेला आहे.