दिनो मौर्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरुन भाजप नेते नितेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला


मुंबई – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बॉलिवूड अभिनेता दिनो मौर्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कारवाई केली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ईडीने केलेल्या कारवाईवरुन दिनो मौर्यावर निशाणा साधत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दिनो मौर्या मुंबई महानगरपालिकेचा दुसरा सचिन वाझे असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

दिनो मौर्या संदेसरा बंधूंनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत सापडला आहे. विधीमंडळातही दिनो मौर्या हा सरकारचा जावई आहे का असा सवाल नितेश राणे यांनी केला होता. तसेच दिनो मौर्यावर कारवाई झाली पाहिजे, यामुळे मुंबई महानगरपालिकेमधील अनेक पेंग्वीन बाहेर पडतील, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

दिनो मौर्यावर झालेल्या कारवाईनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. दिनो मौर्याने ४ ते ५ चित्रपट केले आहेत. पण तो सध्या मुंबई महानगरपालिकेतील आणि सरकारी कामे असतील तर लगेच करुन देतो, असे आश्वासन देत फिरतो आहे. सरकारची कामे करुन देतो, असे सांगणारा हा दिनो मौर्या नक्की आहे तरी कोण? कोणाचा मित्र आहे? कोविड सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचार यांच्यामुळेच झाला आहे, यामुळे यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.


मुंबई महानगरपालिकेतील दिनो मौर्या हा सचिन वाझे आहे. मौर्याची सखोल चौकशी केल्यावर अनेक पेंग्वीन बाहेर पडतील. त्याबाबत भाजपकडे पुरावे देखील असल्याचे ट्विट भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे.