मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त


मुंबई : शुक्रवारी (2 जुलै) काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने जप्त केली आहे. ईडीने ही कारवाई बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात केली असल्याची माहिती ट्वीट करुन दिली आहे.

या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे पीएमएलए कायद्याअंतर्गत सुरुवातीचे आदेश दिल्याचे ईडीने सांगितले. ईडीने आपल्या पत्रकार परिषदेत संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याचे सांगितले. यात आठ मालमत्ता, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स/म्युचल फंड यांचा समावेश आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने म्हटले आहे की, जप्त केलेल्या संपत्तीपैकी तीन कोटी रुपयांची मालमत्ता संजय खान यांची आहे. डिनो मोरियाची संपत्ती 1.4 कोटी रुपये आहे आणि डिजे अकील नावाने लोकप्रिय असलेल्या अकील अब्दुलखलील बचूअलीची संपत्ती 1.98 कोटी रुपये आहे. तर अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती 2.41 कोटी रुपयांची आहे.

ईडीने म्हटले आहे की, स्टर्लिंग बायोटेक समूहाचे फरार प्रवर्तक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी आपल्या गुन्ह्यातून जे धन मिळवले ते या चार जणांना दिले. प्रवर्तक बंधु नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना एका विशेष न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. पैशांच्या अफरातफरीचे हे प्रकरण 14 हजार 500 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याशी संबंधित आहे. स्टर्लिंग बायोटेक आणि कंपनीच्या मुख्य प्रवर्तक आणि संचालकांनी हा कट रचला होता.