म्हणून पासपोर्टवर नसतात हसरे फोटो

पासपोर्ट किंवा पारपत्र देशाच्या सरकारतर्फे दिला जाणारा एक दस्तऐवज आहे. पासपोर्ट असल्याशिवाय व्यक्ती आंतरराष्ट्रीय प्रवास करून शकत नाही. तुमची ओळख आणि राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचे महत्वाचे काम पासपोर्ट करत असतो. पासपोर्ट शिवाय अन्य देशात प्रवेश करणे बेकायदा असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

पासपोर्ट काढताना जशी व्यक्तीची अन्य माहिती महत्वाची असते तसाच फोटो सुद्धा महत्वाचा असतो. फोटो काढण्याचे काही खास नियम आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे पासपोर्टचा फोटो हसरा असून चालत नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे फोटो अतिशय क्लिअर असावा. नैसर्गिक असावा हे आहे. काही वर्षापर्यंत चष्मा घातलेला किंवा चेहऱ्यावर थोड्या केसांच्या बटा आलेला फोटो ग्राह्य धरला जात असे पण अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यानंतर हे सर्व बदल झाले आहेत.

विमानतळावर बायोमेट्रिक तंत्रज्ञान वापरात आल्यामुळे पासपोर्ट फोटो बाबत नियम बदलले गेले आहेत. अनेक देश पासपोर्ट मध्ये चीप बसवितात. त्यात संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती असते. व्यक्तीच्या चेहऱ्याचा आकार, दोन्ही डोळ्यामधले अंतर, नाक आणि हनुवटी मधले अंतर, जिवणीची रुंदी असे सारे तपशील गेट वरील कॅमेऱ्याने टिपले जातात आणि तुमच्या पासपोर्ट वरील फोटोशी ते जुळले तरच तुम्हाला विमानतळावर सहज प्रवेश मिळतो. अन्यथा तपासणीस सामोरे जावे लागते.