ठोस पुरावा नसताना का साजरा होतो जागतिक युएफओ दिवस?

काल म्हणजे २ जुलै रोजी जगभर जागतिक युएफओ (उडत्या तबकड्या) दिवस साजरा झाला. विशेष म्हणजे उडत्या तबकड्या पाहिल्याचे अनेक दावे गेली कित्येक वर्षे केले जात आहेत मात्र त्याविषयी कोणताही ठोस किंवा ग्राह्य धरता येईल असा पुरावा अद्यापी मिळालेला नाही. मग प्रश्न येतो की तरीही जागतिक युएफओ दिवस का साजरा केला जातो?

आज अनेक वैज्ञानिक उडत्या तबकड्या विषयावर संशोधन करत आहेत. उडत्या तबकड्या बाबत जनजागृती व्हावी आणि आकाशात कोणतीही अनोळखी वस्तू दिसली तर लोकांनी त्याबाबत त्वरित माहिती द्यावी यासाठी हा दिवस साजरा होतो. यापूर्वी हा दिवस २४ जून रोजी साजरा केला जात होता पण नंतर कायमस्वरूपी ही तारीख २ जुलै ठरविली गेली.

२४ जून १९४७ मध्ये वॉशिंग्टनच्या माउंट रेनियर येथे प्रथम ९ हाय स्पीड ऑब्जेक्ट उडताना पहिल्या गेल्या होत्या. त्यापूर्वीही काही अजब वस्तू आकाशात उडताना पहिल्या गेल्या होत्या. जर्मनीच्या न्युरेनबर्ग मधील चित्रे आणि लाकडी कटिंग मध्ये सर्वप्रथम १५६१ मध्ये ग्लोब, क्रॉस, प्लेट सारख्या वस्तू आकाशात उडत असल्याची चित्रे रेखाटलेली सापडली आहेत.

१८४७ मध्ये टेक्सास येथे सिगरेटच्या आकाराची एक वस्तू विंडमिलला थडकली मात्र त्याची नोंद विमान अपघात अशी केली गेली होती. यावेळी तेथे एक मृतदेह सापडला होता पण त्याचे दफन अज्ञात स्थळी केले गेले होते. हा मृतदेह एलियनचा होता असा दावा केला गेला होता. १९४७ मध्ये रोसवेल येथेही एका क्रॅश झालेल्या स्पेसक्राफ्टचा भाग मिळाला होता. हे स्पेसक्राफ्ट दुसऱ्या जगातून आले असल्याचा दावा केला जात होता. येथेही एक मृतदेह मिळाला होता पण १९९४ रोजी हवाई दलाच्या रिपोर्ट मध्ये हा सर्व्हिलान्स बलून होता आणि त्यात डमी माणसे होती असे नमूद केले गेले होते.

भारतात १९५१ मध्ये दिल्ली फ्लाईंग क्लब सदस्यांनी सिगरेटच्या आकाराची एक वस्तू आकाशात पहिली पण ती ज्या वेगाने आली त्याच वेगाने नाहीशी झाली होती. २९ ऑक्टोबर २०१७ मध्ये कोलकाता येथे एक वेगवान प्रखर प्रकाश असलेली वस्तू आकाशात दिसली पण नंतर ती नाहीशी झाली होती. चेन्नई, लखनौ येथेही अनेकदा उडत्या अज्ञात वस्तू दिसल्याच्या बातम्या आल्या होत्या. ४ एप्रिल २०१३ मध्ये भारतीय सेनेने लडाख येथे युएफओ दिसल्याचा दावा केला होता. त्यानंतर सात महिन्यांनी अरुणाचल मध्ये सैनिकांनी युएफओ दिसल्याचा दावा केला होता.