येतोय २० जीबी रॅमचा जबरदस्त स्मार्टफोन

स्मार्टफोन ब्रांड झेडटीईने मोबाईल मार्केट मध्ये क्रांतीकारक पाउल उचलले असून कंपनी येत्या काही दिवसात २० जीबी रॅमचा जबरदस्त स्मार्टफोन बाजारात आणत असल्याचे संकेत दिले आहेत. कंपनीने गेल्या काही दिवसात झेडटीई अॅक्सोन ३० सिरीज फोन अल्ट्रा फाईव्ह जी, अॅक्सोन प्रो फाईव्ह जी लाँच केले आहेत आणि आता कंपनी हा जबदरस्त फोन बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे असे समजते.

कंपनीचे संचालक लु क्वान हो यांनीच या नव्या फोन संबंधी माहिती दिली असून चीनी मायक्रोब्लॉगिंग साईट वाईबेवर या फोनची माहिती आहे. विशेष म्हणजे अजून लॅपटॉप मध्ये सुद्धा २० जीबी रॅम दिली गेलेली नाही. आत्तापर्यंत आसुस, लेनेवो ने १८ जीबी पर्यंत रॅम असलेले फोन लाँच केले असले तरी ते मेनस्ट्रीम मध्ये नाहीत. अनेक प्रीमियम फोन १२ जीबी ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत. अॅपलने सुद्धा आत्तापर्यंत जास्तीत जास्त ६ जीबी रॅमचे फोन आणले आहेत.

नवा झेडटीई फोन २० जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज सह असेल असे समजते. हा गेमिंग सेंट्रीक फोन असेल असे सांगितले जात आहे तर काही तज्ञाच्या मते या फोन साठी व्हर्च्युअल रॅम असू शकेल.