जगातील सर्वात मोठे मेडल, युएई शाळेचे गिनीज रेकॉर्ड

युएईची श्रीमंती आणि ऐश्वर्य याविषयी किती बोलावे तेवढे थोडे अशी परिस्थिती आहे. येथील विमानकंपन्यापासून वास्तूकलेपर्यंत सर्वत्र ऐश्वर्याचे दर्शन होते. येथील एका शाळेने भारीभक्कम सुवर्णपदक तयार करून देशाच्या या कीर्तीत भर घातली आहे. या शाळेचे हे मेडल जगातील सर्वात मोठे मेडल म्हणून गिनीज बुक मध्ये नोंदले गेले आहे.

६३ चौरस फुटापेक्षा जास्त जागा व्यापणारे हे मेडल इंटरनॅशनल इंडियन स्कूल आबूधाबीने तयार केले आहे. शाळेचा ५ वा वर्षापन दिन आणि युएईचा ५० वा वर्धापन दिन असे निमित्त साधून शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे मेडल स्वतः डिझाईन करून बनविले आहे. ६३.९३ चौरस फुट व्यासाचे हे मेडल ४८५० पौंड म्हणजे २२०० किलोचे आहे. हे वजन एखाद्या हत्तीपेक्षा सुद्धा जास्त आहे.

या मेडलवर युएईचा झेंडा, आबूधाबी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच देशातील महत्वाची प्रतीके कोरली गेली आहेत. युपीआय डॉट कॉमवर शाळेने फेसबुक पोस्टवर ही माहिती दिली आहे. हे पदक शाळेच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देणारे ठरेल असेही त्यात म्हटले गेले आहे. हे पदक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे.