कॅनडा पंतप्रधान जस्टीन टूडोंनी घेतली दोन कंपन्यांची करोना लस
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टूडो यांनी करोना लस घेण्याबाबत वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी पहिला डोस अॅस्ट्राजीनेका लसीचा तर दुसरा डोस मॉडर्ना लसीचा घेतला आहे. अर्थात १७ जून रोजी नॅशनल अॅडव्हायझरी कमिटी ऑन इम्युनायझेशन ने पहिला डोस अॅस्ट्राजीनेकाचा घेतला असेल तर दुसरा डोस फायझर किंवा मॉडर्नाचा घेता येईल असे जाहीर केल्यानंतर जस्टीन यांनी हा पर्याय स्वीकारला आहे असे समजते.
करोना लसीचे दोन वेगळ्या कंपन्यांचे डोस घेतले तर शरीरात अधिक चांगली प्रतिकारशक्ती बनते असे जर्मनीत झालेल्या संशोधनाचा हवाला देऊन सांगितले जात आहे. जर्मन संशोधकांनी एक डोस अॅस्ट्राजीनेका व दुसरा फायझर किंवा मॉडर्नाचा घेणे अधिक उपयुक्त असल्याचे शिवाय असे लसीकरण करोनाच्या अन्य व्हेरीयंट वर प्रभावी ठरत असल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे.
शिवाय अॅस्ट्राजीनेका लसीच्या दुष्परिणामाबाबत नवीन आकडेवारी कॅनडाने जाहीर केली असून पब्लिक हेल्थ एजन्सीच्या अहवालानुसार १८ जून पर्यंत अॅस्ट्राजीनेकाचे ३ कोटी डोस दिल्या गेलेल्यापैकी १७१९ व्यक्तींना त्यांची गंभीर रीअॅक्शन आली आहे. त्यात अॅलर्जी आणि रक्तात गुठळ्या होणे, अन्य काही दुर्लभ प्रकारची लक्षणे दिसणे असे प्रकार आहेत. भारतात हीच लस कोविशिल्ड नावाने दिली जात आहे.