ममता दीदींची मँगो ट्रीट, मोदी, शहाना केले आंबे गिफ्ट

दहा वर्षापूर्वी प्रथम सत्तेवर आल्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी यांनी सुरु केलेली मँगो ट्रीट परंपरा यंदाही कायम राखली असून ममता दीदीनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या कडे बंगालचे खास आंबे गिफ्ट म्हणून रवाना केले आहेत.

राजकारणात कुणी कुणाचा मित्र नाही आणि कुणी कुणाचा शत्रू नाही असे म्हटले जाते. मात्र सत्तेवरील सरकार आणि विरोधी पक्ष नेहमीच एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकताना दिसतात. नुकत्याच पार पडलेल्या प. बंगाल विधानसभा निवडणुकीत तर शत्रुत्वाच्या साऱ्या मर्यादा पार केल्या गेल्या होत्या. ममता बॅनर्जी, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातील खडाजंगी तर फारच गाजत होती. पण आता निवडणुका पार पडल्या आहेत आणि तिसऱ्यावेळी ममता दिदींच्या गळ्यात मुख्यमत्री पदाची माळ पडली आहे. ममता दिदींनी पाठविलेल्या बंगालच्या खास हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग आंब्याच्या भेटीने राजकीय गोडी वाढेल का याची प्रतीक्षा केली जात आहे.

बंगाल मध्ये सरकार स्थापना झाली तरी राजकीय हिंसाचार सुरूच आहे. नारद घोटाळा प्रकरणात मुख्य सचिवांची बदली, राज्यपाल जगदीप धनखड यांना ममता दीदींचा विरोध पाहता अजूनही बंगाल सरकार आणि केंद्र सरकार आमने सामने आहेत असे म्हणता येते. ममता दीदी मोदींना बंगाली मिठाई सुद्धा पाठवितात. याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी अक्षयकुमार बरोबर झालेल्या एका मुलाखतीत केला होता. मोदी म्हणाले होते, त्यांना बंगाल मिठाई प्रिय आहे आणि ममता दीदी त्यांच्यासाठी आवर्जून मिठाई पाठवितात.