बेजोससह अंतराळात जाणार वॉली, ६० वर्षानंतर पूर्ण होणार स्वप्न

अमेझॉन सीईओ जेफ बेजोस त्यांच्या ब्ल्यू ओरीजीन कंपनीच्या न्यू शेफर्ड कॅप्सूल मधून २० जुलै रोजी अंतराळ प्रवास करणार आहेत. त्यांच्या या प्रवासात वॉली फंक सामील होणार असून वॉली यांचे अंतराळ प्रवासाचे स्वप्न अचानक ६० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पूर्ण होणार आहे. जेफ बेजोस यांनीच त्यांच्या सोबत ८२ वर्षीय वॉली फंक अंतराळ प्रवासास जाणार असल्याची घोषणा केली आहे. या निमित्ताने अंतराळात जाणारी सर्वात वयोवृद्ध महिला असे रेकॉर्ड वॉली यांच्या नावावर नोंदविण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ६० वर्षापूर्वी म्हणजे १९६१ साली अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने एक प्रोग्राम आखला होता. त्यात अंतराळ झेपेसाठी १३ महिलांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. त्यात त्यावेळी वॉली, सर्वात लहान वयाची महिला सामील होती. मर्क्युरी १३ नावाचे हे मिशन काही कारणाने रद्द केले गेले आणि वॉलीचे अंतराळ प्रवासाचे स्वप्न अधुरे राहिले. ते असे अचानक ६० वर्षानंतर पूर्ण होण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

जेफ यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क आणि अन्य एक व्यक्ती अंतराळप्रवासाला जाणार आहे. या व्यक्तीचे नाव जाहीर केले गेलेले नाही. हे उड्डाण ११ मिनिटांचे आहे. वॉली फंक अॅव्हीएशन क्षेत्रात चांगल्याच नावाजलेल्या आहेत. त्या फेडरल अॅव्हीएशन अॅडमिनीस्ट्रेशन मधल्या पहिल्या महिला इन्स्पेक्टर होत्याच पण नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डच्या पहिल्या महिला एअर सेफ्टी इन्व्हेस्टिगेटर सुद्धा आहेत. त्यांच्या नावावर १९.६ हजार तासांचा उड्डाण अनुभव असून ३ हजार लोकांना त्यांनी उड्डाण प्रशिक्षण दिले आहे.