जगातील नामवंत व्यक्तींच्या अजब सवयी

जगात प्रसिद्ध असणाऱ्या बहुतेक सर्व क्षेत्रातील व्यक्ती काही ना काही कारणाने सतत चर्चेत असतात. या व्यक्तींविषयी काही नवे ऐकायला मिळाले की त्याच्या बातम्या खूप चवीने वाचल्या जातात असेही दिसून येते. पण जगातील काही पॉवरफुल व्यक्तींच्या सवयी अनेकदा अजब वाटाव्या अश्या असतात. आज अशाच काही नेत्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

जर्मनीच्या चान्सेलर अन्जेला मर्केल पॉवरफुल महिला राजकारणी नेत्या आहेत. त्यांच्या आयुष्याचा ३५ वर्षाचा काळ कम्युनिस्ट सत्तेखाली असलेल्या पूर्व जर्मनीत गेला. त्याकाळात रोजच्या जीवनावश्यक वस्तू सुद्धा सहज मिळत नसत. त्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत. मर्केल यांनीही हा अनुभव पुरेपूर घेतला आहे. त्यामुळे वस्तू त्यातही किराणा माल साठवून ठेवण्याची त्यांची सवय आजही कायम आहे. त्यामुळे त्या अनेकदा गरज नसलेल्या वस्तू सुद्धा साठवून ठेवतात.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा दिवस दुपारी सुरु होतो. याचे कारण म्हणजे त्यांना रात्री उशिरा काम करायला आवडते. त्यामुळे काम संपल्यावर ते झोपतात आणि दुपारीच उठतात. पुतीन दिनचर्या अतिशय कसोशीने पाळतात. दुपारी उठल्यावर नाश्ता, त्यानंतर दोन तास स्वीमिंग मग वेट लिफ्टिंग असा व्यायाम घेतात. नंतर गार आणि गरम पाण्याने अंघोळ असे हे डेली रुटीन आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना वटवाघुळाविषयी विशेष आस्था आहे. आज जगभर हैदोस घातलेल्या करोनाचा उगम वटवाघळातून झाला असला तरी राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या महालाच्या मुख्य हॉल मध्ये वटवाघळासाठी शाही सुरक्षा वाढविली आहे. हाउस कीपिंग करणाऱ्या स्टाफला वटवाघळाना नुकसान पोहोचवू नका असे त्यांचे आदेश आहेत म्हणे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान खाण्यापिण्याबाबत अतिशय बेफिकीर असल्याचे त्यांची दुसरी पत्नी रेहम खान यांचे म्हणणे होते. रेहम खान सांगतात, इम्रान अनेकदा नोकरांच्या घरून जेवण मागवून जेवतात तर अनेकदा काही न खाता पिता तसेच झोपून जातात.

कॅथोलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस याना फुटबॉल पाहणे खूप आवडते. पिझा आवडतो. पण सर्वात आवडती चीज म्हणजे आफ्रिकी डान्सफॉर्म टँगो. ते तरुण वयात या डान्सचा सराव करत असत. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा म्हणजे तेन्जिंग ग्यात्सो यांना घड्याळ काम करणे मनापासून आवडते. घड्याळे खोलुन पुन्हा जोडणे हा त्यांचा छंद आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी दलाई लामाना एक घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ आजही दलाई लामा वापरतात.