कोलंबिया पोलिसांची फेसबुक पोस्ट व्हायरल, हवा आहे झुकेरबर्गचा डुप्लीकेट

कोलंबिया पोलिसांनी वाँटेड संशयितासाठी फेसबुकवर टाकलेली पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. याचे कारण म्हणजे पोलिसांनी या संदर्भात पोस्ट केलेल्या दोन संशयितांच्या स्केचेस पैकी एकाचे फेसबुक सीईओ मार्क झुकेरबार्ग याच्या बरोबर खुपच साम्य आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी २२ कोटीचे इनाम जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोलंबियाचे राष्ट्रपती इव्हान ड्युक ज्या हेलीकॉप्टर मधून २८ फेब्रुवारी रोजी प्रवास करत होते त्या हेलीकॉप्टरवर दोन माणसांनी तुफान गोळीबार केला होता. या प्रवासात कोलंबियाचे रक्षा मंत्री व एका राज्याचे गव्हर्नर सुद्धा राष्ट्रपतीं सोबत होते.

ज्या साक्षीदारांनी गोळीबाराची घटना प्रत्यक्ष पाहिली होती त्यांच्या सांगण्याप्रमाणे पोलिसांनी संशयितांची स्केचेस आर्टिस्ट कडून बनवून घेतली आणि ती फेसबुकवर पोस्ट केली. पण यातील एक स्केच मार्क झुकेरबर्ग यांच्याशी खुपच साधर्म्य दाखविणारे असल्याने पाहता पाहता ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यावर अनेक मिम्स बनली आहेत. आरोपींची माहिती देणाऱ्यांसाठी पोलिसांनी संपर्क क्रमांक दिला आहे.