चीन कम्युनिस्ट पार्टीची शंभरी

जगातल्या सर्वात मोठ्या लोकसंखेच्या देशावर मजबूत पकड मिळविणाऱ्या, आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट आंदोलनाला दिशा देणाऱ्या आणि जगावर राजकीय प्रभाव पडणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीला आज म्हणजे १ जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी सकाळीच थियानमेन चौकात देशाला उद्देशून संदेश दिला. त्यात त्यांनी आमच्या वाट्याला जाणाऱ्या कोणत्याही देशाची गय केली जाणार नाही आणि जशास तसे उत्तर दिले जाईल असे जाहीर केले.

चीनी नेता माओ त्से तुंग यांनी १ जुलै १९२१ मध्ये कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली आणि १९७६ मध्ये निधन होईपर्यंत तेच या पक्षाचे प्रमुख होते. वास्तविक नेतेपदाचा दुसरा कार्यकाल संपत असताना अध्यक्षाने आपल्या महासचिव उत्तराधिकारीची घोषणा करण्याची प्रथा आहे. मात्र शी जीनपिंग यांनी अशी घोषणा केलेली नाही. पार्टी नेत्यांच्या मते आज चीन जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आहे. अश्यावेळी शी जीनपिंग हेच नेते असणे आवश्यक आहे.

आजच्या कार्यक्रमात परंपरेनुसार सैनिक परेड झाली नाही. थियानमेन चौक सर्वसामान्य नागरिकांसाठी गेला महिनाभर बंद ठेवला गेला होता. कार्यक्रमाला उपस्थित पत्रकारांना कोविड लस अथवा कोविड निगेटीव्ह रिपोर्ट देणे बंधनकारक केले गेले होते. कार्यक्रमाचे थेट प्रसारण सरकारी मिडीयावरून केले गेले.