सैनिकांना अदृश्य बनविणारे जादुई नेट इस्रायलने बनविले

इस्रायलच्या रक्षा मंत्रालयातील वैज्ञानिकांनी एक खास कॅमोफ्लेज नेट म्हणजे जाळी तयार केली आहे. हे नेट शरीरावर पांघरले की व्यक्ती जणू अदृश्य होणार आहे. हे नेट प्रामुख्याने सैनिकांसाठी बनविले गेले असून सैनिकांनी ते अंगावर घेतले की दुरून हे सैनिक एखाद्या दगडाप्रमाणे दिसणार आहेत. शत्रूपासून सैनिकांचा बचाव व्हावा हा या मागच्या उद्देश आहे.

हे नेट दोन्ही बाजूनी वेगळे डिझाईन असलेले आहे. एका बाजूला दाट हिरवाई मध्ये सहज लपता येईल असे डिझाईन आहे तर दुसऱ्या बाजूला वाळवंटी प्रदेशात एखादा दगड असावा असे डिझाईन आहे. विशेष म्हणजे थर्मल डिटेक्टर सुद्धा हे नेट पांघरलेल्या सैनिकाचा शोध घेऊ शकत नाही. तसेच नाईट व्हिजन उपकरणे सुद्धा त्याला ओळखू शकत नाहीत.

रिसर्च, डेव्हलपमेंट युनिट मधील इनोव्हेटिव्ह मटेरिअल तयार करणारे पोलारीस यांनी असा दावा केला आहे की हे नेट शरीरावर घातले तर सैनिक जणू अदृश्य होणार आहे. या नेटचे नामकरण किट ३०० असे केले असून त्याच्या अनेक वेळा चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या नेटचे वजन फक्त ५०० ग्राम असून युद्ध परिसरात सैनिक ते सहज वाहून नेऊ शकणार आहेत. हे नेट भक्कम आहे त्यामुळे जखमी सैनिकांसाठी स्ट्रेचर म्हणून सुद्धा त्याचा वापर होऊ शकणार आहे. वॉटरप्रूफ असे हे नेट २२५ किलोचे वजन पेलू शकते शिवाय सैनिक त्याचा पांघरूण म्हणून सुद्धा वापर करू शकतात.