करोनासह जगण्याची सिंगापूर नीती

गेले १८ महिने जगाला वेठीला धरलेल्या करोनाचा अंत कधी होणार याची प्रतीक्षा मोठ्या आशेने केली जात असताना सिंगापूरने एक खास नीती स्वीकारली आहे. करोनासोबतच कायम जगण्याची नवी नीती देशाने आखली आहे. सिंगापूरचे व्यापार मंत्री गान किम योंग, वित्तमंत्री लॉरेन्स वोंग आणि आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी स्टेट टाईम्स मध्ये या संदर्भात संपादकीय लिहिले असून हे संपादकीय जगभरात चर्चेत आले आहे.

करोना काळात उत्तम व्यवस्थापन केलेल्या सिंगापूरने त्यांच्या करोना धोरणात बदल केला आहे. त्यानुसार करोनाला सर्वसामान्य सर्दी, फ्ल्यू मानून त्यानुसारच उपचार केले जाणार आहेत. सिंगापूर मध्ये २३ जानेवारी २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. एप्रिल पर्यंत ही संख्या दररोज ६०० संक्रमितांवर गेली होती. मात्र ऑगस्ट पासून हा वेग मंदावला होता. ५७ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात आजही रोज २० ते ३० करोना संक्रमित सापडत आहेत. करोनाने आत्तापर्यंत ३६ बळी घेतले आहेत. सिंगापूर सरकारने या काळात टेस्टिंग आणि ट्रेसिंग वर भर दिला होता. ऑगस्ट पर्यंत देशातील २/३ जनतेचे लसीकरण पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे आता सिंगापूरने देशाच्या सीमा खुल्या केल्या आहेत. दरवर्षी माणसाना सर्दी फ्ल्यू होतो आणि रुग्णालयात न जाता ते बरे होतात म्हणून करोना संक्रमिताना सुद्धा प्रकृती गंभीर असेल तरच रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. करोना संक्रमितांचे रोजचे आकडे जाहीर केले जाणार नाहीत. देशात येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन व्हावे लागणार नाही. तसेच करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेशन मध्ये राहण्याची गरज नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.