अंधरुढी तोडून मंदिराने पतीला दिला खांदा

बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिने भारतीय संस्कृतीतील अंध रुढी मोडून पतीला अंतिम प्रवासात खांदा दिला. मंदिराची ही कृती महिलांना प्रोत्साहन देणारी ठरल्याचे दिसून येत आहे. मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाल्याचे आणि त्यांच्या अंत्यसंस्काराचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्यात मंदिरा पतीचा देह स्मशानात नेण्यासाठी अँब्युलंस मध्ये ठेवताना खांदा देताना दिसते आहे.

राज कौशल आणि मंदिरा यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच होती. त्यांची पहिली भेट १९९६ मध्ये मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडीशन देण्यासाठी गेली होती आणि राज तेथे असिस्टंट म्हणून काम करत होते. १४ फेब्रुवारी १९९९ रोजी व्हॅलेंटाइन डे दिवशी त्यांनी लग्न केले होते. राज कौशल यांचा जीवनप्रवास अवघ्या ४९ व्या वर्षी संपला. बुधवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका अल्यावर त्वरित रुग्णालयात दाखल केले गेले पण उपयोग झाला नाही. मंदिरा अखेरपर्यंत पती सोबत होती.

अनेक बॉलीवूड कलाकार राज यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होते. सोशल मीडियावर राज यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.