या सुंदर गावात पडत नाही पाऊस

पाऊस म्हणजे नवजीवन. उन्हाने तापलेल्या भूमीवर पावसाचे पाहिले थेंब पडल्यावर पृथ्वीला जणू नवसंजीवनी मिळते याचा अनुभव आपण घेतो. वाळवंटी प्रदेशात पाऊसमान कमी असते. पण बहुतेक सर्व जगभर पाऊसधारा कोसळतात. भारताच्या मेघालय राज्यातील मासीनराम गावात जगातील सर्वाधिक पाऊस कोसळतो. वाळवंटी प्रदेशात कमी प्रमाणात का होईना पाऊस होतो. पण अजिबात पाऊस पडत नाही असे एखादे नांदते गाजते गाव आपल्या कल्पनेत येऊ शकणार नाही. पण असेही एक गाव येमेन मध्ये अस्तित्वात आहे. अतिशय नितांतसुंदर अश्या या गावात पर्यटक मोठ्या संखेने येतात.

या गावाचे नाव आहे अल हुबैत. येमेनची राजधानी सनाच्या पश्चिमेला हे पहाडी गाव आहे. भूस्थळापासून ३२०० मीटर उंचीवर हे गाव वसलेले आहे. विशेष म्हणजे या गावाचा भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी एक वेगळाच संबंध आहे. या गावात डोंगररांगावर इतकी सुरेख घरे बांधली आहेत की त्यावरून नजर हटविणे अवघड जाते. कोणत्याही भागातून पाहिले तर सुंदर निसर्गाचे दर्शन होते.

या गावाचे विशेष म्हणजे येथे उकाडा आहे. वातावरण गरम असते. थंडीत अगदी सकाळी खूप थंडी असते पण सूर्य उगवला की पुन्हा उकाडा सुरु होतो. ग्रामीण, शहरी शैलीसह प्राचीन आणि आधुनिक वास्तूकलेचा येथे संगम झाला आहे. या गावात पावसाचे ढग गावाच्या खालच्या पातळीवर तयार होतात त्यामुळे येथे पाऊस पडत नाही असे सांगितले जाते. म्हणजे एका अर्थी ढगांच्या वर वसलेले हे गाव आहे.

या गावात येमेनी समुदायाचे लोक राहतात. अल बोहरा अल मूकरमा असेही या समुदायाला म्हटले जाते. या लोकांचे नेतृत्व मुहम्मद बुरहानुद्दीन यांच्याकडे होते. हा मुस्लिमांमधील इस्मायली संप्रदाय असून बुरहानुद्दीन मुंबई मध्ये राहत होते. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र अखेरपर्यंत दर तीन वर्षांनी ते या गावाला भेट देत असत.