शाम बेनेगल यांचा वंगबंधू सांगणार शेख मुजीबुर रेहमान यांची जीवनकथा

बॉलीवूड मधील नामवंत दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शाम बेनेगल बांग्लादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रेहमान यांची बायोपिक बनवीत असून त्यात बांग्लादेशाच्या स्वातंत्र संघर्ष सुद्धा पाहता येणार आहे. मार्च २०२१ मध्ये शेख मुजीबुर रेहमान यांची जन्मशताब्दी साजरी झाली त्या मुहूर्तावर या चित्रपटाचे प्रदर्शन होणार होते मात्र चक्री वादळ, करोना मुळे लागलेला लॉकडाऊन आणि विमान सेवा बंद असल्याने या चित्रपटाचे काम वेळेत होऊ शकले नसल्याचे समजते.

आता मात्र हे काम दोन तीन महिन्यात पूर्ण होत असल्याचे समजते. हा चित्रपट हिंदी आणि बांग्ला भाषेत असेल. काम करणारे बहुतेक कलाकार बांग्लादेशी आहेत. अगोदर या चित्रपटाचे शुटींग बांग्लादेशात होणार होते पण करोनामुळे ते मुंबईच्या फिल्मसिटी मध्येच केले गेल्याचे समजते. भारताची नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन आणि बांग्ला फिल्म डिव्हिजन मिळून या चित्रपटाचे काम करत आहेत.