वजन घटवायचेय? मग दातांना लावा कुलूप

सर्व प्रकारचे व्यायाम, विविध डाएट, अनेकांच्या सल्ल्यानुसार आहार, उपवास करून सुद्धा अनेकांचे वजन कमी होत नाही. अश्या वेळी वजन कमी करण्यासाठी सर्जरी हा एक मार्ग राहतो. पण हा मार्ग खर्चिक आहे आणि प्रत्येकला तो जमेल असे नाही. आता संशोधकांनी एक असे उपकरण तयार केले आहे ज्यामुळे तुमचे वजन आरामात कमी होऊ शकणार आहे.

डेंटल स्लीम डाएट कंट्रोल असे याचे नाव असून न्यूझीलंड मधील ओटागो विद्यापीठातील संशोधकांनी ते तयार केले आहे. हे एक प्रकारचे कुलूप म्हणता येईल. मागच्या दातांवर हे उपकरण बसविले जाते. यामुळे सॉलिड पदार्थ खाता येत नाहीत. फक्त लिक्विड घेता येते. परिणामी आपोआप वजन घटू लागते. बोल्टच्या सहाय्याने हे उपकरण बसविले जाते. यामुळे फक्त २ मिलीमीटर तोंड उघडता येते.

या उपकरणामुळे बोलण्यात किंवा श्वास घेण्यात काहीही अडचण येत नाही असे सांगितले जात आहे. या उपकरणाच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून दोन आठवड्यात ६ किलो वजन कमी झाल्याचे दिसून आले आहे. डेंटिस्ट हे उपकरण बसवू शकतील. हे उपकरण हवे तेव्हा काढणे आणि पुन्हा लावणे शक्य असून याचा कोणताही दुष्परिणाम नाही असाही संशोधकांचा दावा आहे.