पाच वर्षात येणार ‘सुपरहिरो’ लस

करोना साठी अॅडव्हांस वॅक्सिन बनविण्याची चर्चा जगात मोठ्या प्रमाणावर सुरु झाली असताना स्टँडफर्ड मधील वैज्ञानिकांनी लवकरच ‘सुपरहिरो’ वॅक्सिन येत असल्याचा दावा केला आहे. या लसीमध्ये ऑलिम्पिक अॅथलेटस च्या डीएनएचा वापर होणार आहे आणि त्यामुळे ही लस घेतली की माणसाला सुपरहिरो सारखी इम्युनिटी मिळेल असा दावा केला जात आहे.

या विषयी माहिती देताना लस तयार करण्यात कार्यरत असलेले डॉ.युआन अॅश्ले यांचा दावा आहे की ही लस एकदा घेतली की माणसाच्या मृत्यूची प्रमुख तीन कारणे म्हणजे, हृदयरोग, स्ट्रोक आणि अल्झायमर यापासून माणसाचे रक्षण होईलच पण यकृत विकारात सुद्धा ही लस उपयुक्त असेल. म्हणजे माणूस जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत असा कुठलाच आजार नसेल ज्या विरुद्ध माणूस लढा देऊ शकणार नाही.

यात करोना सारखे घातक विषाणू, जीवाणू शरीरात म्युटेट झाले तरी त्यांना लगाम घालता येईल. म्हातारपणापर्यंत जीवघेण्या आजारांचा धोका राहणार नाही. यात ऑलिम्पिक अॅथलेटसच्या कोशिका वापरल्या जात आहेत कारण त्या अधिक मजबूत असतातच शिवाय ऑलिम्पिक अॅथलेटसची रोगप्रतिकार शक्ती सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त असते. जीनोमिक मेडिसिनच्या सहायाने अशी लस बनविणे शक्य होत आहे.

अर्थात यावर गेली कित्येक दशके काम सुरु आहे आणि आता त्याचे सुधारित तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्याने भविष्यात लोकांची जनुके म्हणजे जीन्स रिपेअर करता येतीलच पण चमत्कार केल्याप्रमाणे डीएनए बदलता सुद्धा येतील असाही दावा डॉ. युआन यांनी केला आहे.