देशाच्या सैनिकांना मिळणार स्वदेशी सामान

आज भारतात बनलेल्या अनेक वस्तू विदेशी लष्करासाठी निर्यात केल्या जात असल्या तरी भारतीय जवानाच्या उपयोगाच्या अनेक वस्तू, सामान परदेशातून आयात केले जाते. मात्र याबाबत परदेशांवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वदेशीकरणावर जोर दिला जात आहे. आत्मनिर्भर भारत योजनेखाली अन्य क्षेत्राप्रमाणेच रक्षा मंत्रालयाने सेनेसाठी वापरल्या जाणाऱ्या २०९ वस्तू निगेटिव्ह इम्पोर्ट लिस्ट मध्ये सामील केल्या आहेत. याचा अर्थ या वस्तू आता देशातच बनणार आहेत.

या यादीत क्रुझ मिसाईल, टँक इंजिन, आर्टिलरी गन पासून सैनिकांना कोणत्याही हवामानात ववापरता येणारे कपडे, बूट, तंबू, स्लीपिंग बॅग, रेन बॅग यांचा समावेश आहे. हाडे गोठविणाऱ्या थंडीपासून सीमेवर सतत खडा पहारा देणाऱ्या सैनिकांना शरीर बचावासाठी विशेष कपडे, बूट आवश्यक असतात. आजपर्यंत हे कपडे परदेशातून आयात होत होते. म्यानमार मधून दास्ताने तर ग्लेशियर भागात तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी स्लीपिंग बॅग श्रीलंकेतून मागविल्या जात होत्या.

वास्तविक कानपूर येथे इस्रायली सेनेसाठी बूट बनवून निर्यात केले जातात तेथेच भारतीय सेनेसाठी बूट बनू शकतात. सैनिकी सामानाची आयात कमी करण्याचा प्रस्ताव २०१८ मध्ये आला होता पण त्याची अमलबजावणी आता सुरु झाली आहे. भारताने सेना उत्पादन क्षेत्रात १०० टक्के एफडीआयला मंजुरी दिल्यामुळे भारतात या विदेशी कंपन्या त्याचे प्रकल्प उभारू शकत आहेत.

यामुळे चर्म उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. आर्मी युनिफॉर्म सुद्धा पूर्ण स्वदेशी करण्यावर भर दिला जात आहे. स्लीपिंग बॅग, केमोफ्लेज तंबू, जॅकेट साठी बंगलोर कंपनी काम करणार आहे. सैनिकांसाठी कपडे बनविताना विषम हवामानात सहज झेलू शकतील अशा विशेष कापडापासून बनविले जातात. हे कापड आजपर्यंत चीन मधून येत होते मात्र आता ते देशातच तयार होणार आहे असेही समजते.