तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटे एवढी नसेल; संशोधकांनी वर्तवला अंदाज


मुंबई – साधारणतः ८० टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेल्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका तुलनेने कमी असेल, असे टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संशोधकांकडून सांगण्यात आले आहे. पण दुसऱ्यांदा कोरोना होणाऱ्यांचा विचार ह्या अभ्यासात करण्यात आलेला नाही. तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा कोरोना होणे हे धोका असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

१७ महिन्यांहूनही अधिक काळ भारतात कोरोनाचा शिरकाव होऊन आता लोटला असल्यामुळे ज्यांना अगदी सुरुवातीला पहिल्या लाटेतच कोरोना होऊन गेला, त्यांच्यातील प्रतिपिंडे आता कमी झाली असतील. त्यामुळे त्यांना या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे या संस्थेचे अभ्यासक आणि डीन डॉ. संदिप जुनेजा यांनी सांगितले. पुनर्बाधितांवर स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रित करायला हवे आणि लवकरात लवकर त्यांना तिसऱ्या लाटेपासून दूर कसे ठेवता येईल, याचा विचार करायला हवे असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे ज्यांना अजूनही कोरोनाची लागण झालेली नाही, अशा २० टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

ते पुढे म्हणाले, कोरोना होऊन गेलेल्या ८० टक्के नागरिकांपैकी १० टक्क्यांना पुन्हा लागण होईल असे गृहीत धरुया. त्यांना लागण झाल्यावर तशाच प्रकारची लक्षणे दिसतील आणि त्याच क्रमाने ते बरे होतील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर परिणाम करणारे तीन घटक मानता येतील- एक म्हणजे नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी ठरेल, दुसरे म्हणजे राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक निर्बंध उठवणे आणि सगळ्यात म्हणजे कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करणे.

आपल्याला साधारणतः सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल. पण पुनर्बाधितांना सौम्य लक्षणे असतील, नवा कोणताही व्हेरिएंट आला नाही आणि जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकऱण झाले, त्याचबरोबर लस ७५ ते ९५ टक्के प्रभावी ठरली, तर या तिसऱ्या लाटेचा धोका आणि तीव्रता कमी होऊ शकते.