‘स्‍लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटोने लग्नाआधीच दिली गूड न्यूज


ज्या चित्रपटामुळे संगीतकार ए. आर. रहमान यांना प्रतिष्ठित असा पुरस्कार मिळाला, तो चित्रपट म्हणजे ‘स्लमडॉग मिलेनियर.’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री फ्रीडा पिंटोने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण सध्या फ्रीडा चर्चेत आहे. फ्रीडाने सोशल मीडियाद्वारे आई होणार असल्याचे सांगितल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत.

फ्रीडाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणारा पती कॉरी ट्रॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. फ्रीडा या फोटोमध्ये प्रेग्नंट असल्याचे दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करत लवकरच तिच्या बाळाचा जन्म होणार असल्याचे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे फ्रीडाने गूड न्यूज दिल्यानंतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री नरगिस फाखरीने कमेंट करत तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा, असे म्हटले आहे.


फोटोग्राफर कॉरी ट्रॅनसोबत फ्रीडाने २०१९मध्ये साखरपुडा केला. फ्रीडाने कॅरीच्या वाढदिवशी फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची माहिती दिली होती. त्या दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही. आता फ्रीडाने आपण प्रेग्नंट असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. फ्रीडा ही एक भारतीय अभिनेत्री असली तरी ती ब्रिटीश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम करताना जास्त दिसते.