सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रिअॅलिटी शो चर्चेत असतो. गीतकार जावेद अख्तर यांनी इंडियन आयडल १२ मधील एका भागात हजेरी लावली होती. जावेद अख्तर यांची गाणी त्या भागात सगळ्या स्पर्धकांनी गायिली. जावेद यांनी त्यांच्या प्रत्येक गाण्यामागची कहाणी सांगितली आहे. दरम्यान, जावेद यांनी स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. पण त्यांनी जेव्हा स्पर्धक शन्मुखप्रियाचे कौतुक केले, त्यावेळी जावेद अख्तर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.
शन्मुखप्रियाचे कौतुक केल्यामुळे ट्रोल झाले जावेद अख्तर
जावेद अख्तर यांनी शन्मुखप्रियाचे गाणे उत्तम असल्याचे सांगितले. ते म्हणाले मी आत्तापर्यंत शन्मुखप्रियाचे यूट्यूबवर बरेच परफॉर्मन्स पाहिले. पण आज तिला लाइव्ह परफॉर्म करताना पाहिले. असेच काम करत रहा, भविष्यात खूप पुढे जाशील. या नंतर शन्मुखप्रियाने देखील आपले मत व्यक्त केले. जावेद अख्तर यांच्यासमोर गाण्याची संधी दिल्याबद्दल तिने इंडियन आयडलचे आभार मानले आणि त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचेही तिने सांगितले.
पण काही नेटकऱ्यांना शन्मुखप्रियाचे जावेद अख्तर यांनी केलेले कौतुक पटलेले नाही असे दिसून येत आहे आणि त्यांनी जावेद अख्तर यांना ट्रोल केले. सोशल मीडियावर #indianidol12 worstseason हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसून आला. काही यूजर्सने तर #skipindianidol असा नारा सोशल मीडियावर लावल्याचे दिसून येत आहे. एका यूजरने ट्वीट करत शन्मुखप्रियाचे चाहते वेडे असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने शोचे परीक्षक देखील वेडे असल्याचे म्हटले आहे.