उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेट; उद्धव ठाकरेंना अतुल भातखळकर यांचा सवाल


मुंबई – काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केल्यानंतर आता या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली. या अटकेनंतर खळबळ उडाली असून, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला.

योगी सरकारने उत्तर प्रदेशात धर्मांतरांच्या घटना वाढल्याचा दावा करत धर्मांतर विरोधी कायदा लागू केला. या कायद्याखाली कारवाया केल्या जात असतानाच अवैधपणे धर्मांतर करणाऱ्या दोघांना उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली. हे दोघे देशभरात केल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा भाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. तत्पूर्वी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केल्यानंतर सोमवारी एटीएसने आणखी तिघांना अटक केली आहे.

भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी या वृत्ता हवाला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ट्विट करत भातखळकर यांनी ठाकरे यांना सवालही केला आहे. उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.