हे आहे अलिशान अंडरग्राउंड हॉटेल

पर्यटन किंवा कामानिमित कुठेही परगावी जायचे असेल तर प्रथम शोध घेतला जातो हॉटेल्सचा. जगभरात आज कोटींच्या संखेने हॉटेल्स आहेत त्यातील कित्येक गगनचुंबी, महागडी आणि अलिशान स्वरुपाची आहेत. हॉटेलची शान इमारत किती उंच यावर ठरत असते. पण चीनच्या शांघाय मध्ये तयार झालेले एक अलिशान हॉटेल त्याच्या खोली मुळे चर्चेत आहे. हे १६ मजली हॉटेल आहे. पण त्याचे फक्त दोन मजले जमिनीवर आहेत तर बाकी १४ मजले जमिनीखाली आहेत. त्यातही शेवटचे दोन मजले चक्क पाण्याखाली आहेत.

हे हॉटेल बांधायला १० वर्षे लागली आणि खर्च आला २ हजार कोटी रुपये. ८८ मीटर खोल असलेल्या या हॉटेलचे नाव आहे इंटरकॉंटीनेन्टल शांघाय वंडरलँड व शिमाओ क्वेरी हॉटेल. नॅशनल जिओग्राफिकने या हॉटेलला करीश्माई वास्तूरचना म्हटले आहे. ब्रिटीश आर्किटेक्ट मार्टीन जोकमन यांनी या हॉटेलचे डिझाईन केले आहे. हे हॉटेल जेथे बांधले गेले आहे तेथे पूर्वी मोठा खड्डा होता. मार्टीन यांना त्यातून शहर आणि निसर्ग यांचे नाते अधिक चांगले दाखविता येईल अशी कल्पना सुचली आणि त्यातून या हॉटेलचा जन्म झाला.

या हॉटेलचे शेवटचे दोन मजले सरोवरात आहेत. या हॉटेल मध्ये ३३६ रुम्स, रेस्टॉरंट, रॉक क्लायबिंग, बंजी जम्पिंग सह अनेक सुविधा आहेत. या हॉटेलचे डिझाईन असे केले गेले आहे की प्रत्येक रूम मधून झऱ्याचे दर्शन व्हावे. या हॉटेल मध्ये एका रात्रीचे भाडे आहे ३५ हजार रुपये.