लढाऊ ड्रोनची पुढील १० वर्षात होणार प्रचंड खरेदी

आगामी दहा वर्षात हल्ला करू शकणाऱ्या ड्रोनची जगभरातील देश मोठ्या प्रमाणवर खरेदी करतील असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. परिणामी या हल्लेखोर ड्रोन पासून बचावाचे उपाय या चर्चेला सुद्धा उधाण आले आहे. जम्मू मधील हवाई दलाच्या बेसवर शनिवारी पहाटे दोन ड्रोन मधून स्फोटके टाकल्याची घटना घडून काही तास लोटतात तोपर्यंत रविवारी लष्करी ठाण्याजवळ पुन्हा ड्रोन दिसल्याची आणि सुरक्षा रक्षकांनी त्यावर गोळ्या झाडल्यावर ती पळून गेल्याची घटना घडली. त्यानंतर हल्ले करणाऱ्या ड्रोन बाबत चर्चा जोरात सुरु झाली आहे.

ड्रोन ही मानवरहित, छोट्या आकाराची विमाने अनेक कारणांनी वापरली जात आहेत. सामान वाहतूक, मॅपिंग, गस्त, देखरेख आणि हेरगिरी साठी सुद्धा ड्रोन वापरात आहेत. मात्र आता त्यातून स्फोटके टाकणे आणि शस्त्र वाहतूक केली जात आहे आणि त्यामुळे केवळ ड्रोन निगराणी आणि अश्या ड्रोन विक्रीवर निर्बंध ही पुरेशी उपाययोजना होऊ शकत नाही असे तज्ञांचे मत आहे.

हत्यार पुरवठ्यासाठी ड्रोनचा पहिला वापर अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर सुरु झाला होता. ऑक्टोबर २००१ मध्ये अमेरिकन सिक्युरिटीने तालिबानी लीडर मुल्ला उमर याला ड्रोनने टार्गेट केले होते पण तो या हल्ल्यातून वाचला होता. ९/११ चा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन याचा शोध प्रिडेटर ड्रोननेच लावला होता. त्यानंतर अमेरिकेने प्रीडेटर आणि रिपर ड्रोन अफगाणीस्तान मध्ये तैनात केली होती. अर्थात अमेरिका ड्रोन ऑपरेशन संदर्भातील डेटा कधीच जाहीर करत नाही.

ब्रिटनने २०१४ ते १८ या काळात इराक, सिरीया मध्ये आयएसआयएस म्हणजे इसीसच्या तळांवर २४०० ड्रोन हल्ले केले होते म्हणजे दिवसाला दोन हल्ले. त्यातील ३९८ स्ट्राईकनी लक्षभेद केला होता असे आकडेवारी सांगते. भारताला ड्रोन हल्ले नवे असले तरी जगभरातील लष्करे काँबॅट ड्रोनचा वापर अनेक वर्षांपासून करत आहेत.

आगामी दहा वर्षात अश्या ड्रोनची मागणी प्रचंड वाढणार असून अमेरिकेने १ हजार लढाऊ ड्रोनचा ताफा तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. चीन ६८, रशिया ४८ तर भारत ३८ ड्रोन बाळगून असल्याचे सांगितले जाते.