सोशल मिडियावर शरद पवार यांचा वादग्रस्त फोटो, युवकाविरुद्ध एफआयआर दाखल

मुंबई पोलिसांनी सोमवारी सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष आणि जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांचा वादग्रस्त फोटो शेअर करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून एफआयआर नोंदविला असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डी. एस. सावंत यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत त्यांनी फेसबुक युजरने शरद पवार यांचा संपादित फोटो शेअर केल्याचे म्हटले असून हा फोटो वादग्रस्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फोटो टाकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविली गेली असून त्याला पकडण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्ष दल नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पवार यांनी तीन वेळ भेट घेतल्याने देशात भाजप विरुद्ध तिसरी आघाडी जन्माला येणार काय या चर्चेला जोर चढला आहे. या पार्श्वभूमीवर पवारांचा वादग्रस्त फोटो शेअर केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.