युवराज सिंहच्या बॅटमधून पुन्हा होणार चौकार-षटकारांची आतषबाजी

मेलबर्न क्रिकेट क्लबने यावर्षीच्या उन्हाळ्यात होणाऱ्या टी २० स्पर्धेत भारताचा युवराज सिंग आणि वेस्ट इंडीजचा क्रिस गेल यांच्याबरोबरचा करार अंतिम टप्प्यात आल्याचा दावा केला आहे. मेलबर्न इस्टर्न क्रिकेट असोसिएशनच्या तिसऱ्या स्तरावरील स्पर्धेत खेळणाऱ्या मेल्ग्रेव क्रिकेट क्लब तर्फे दिल्या गेलेल्या माहितीनुसार वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा आणि द. आफ्रिकेचा एबी डीव्हीलेअर बरोबर चर्चा सुरु आहे तर युवराज आणि गेल बरोबरची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत.

या क्लबने अगोदरच श्रीलंकेच्या तिलकरत्ने, दिलशान, उपुल थरंगा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली असून सनथ जयसुर्या यांची सेवा सुद्धा घेतली जाणार आहे. युवराज आणि गेल यांच्याबरोबर ९० टक्के चर्चा पूर्ण झाली असून काही बाबींना अंतिम स्वरूप दिले जात आहे. बड्या खेळाडूंना साईन करण्यासाठी प्रायोजक सहभागाचा प्रयत्न केला जात असल्याचेही समजते. या स्पर्धा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात होणार आहेत.