डीआरडीओच्या करोना औषधाचे डॉ. रेड्डीज कडून व्यावसायिक लाँचिंग

हैद्राबादची डॉ. रेड्डीज फार्मा कंपनी डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने बनविलेल्या करोनावरील औषधाचे, २ डिजी (डीऑक्सि डी ग्लुकोज) व्यावसायिक लाँचिंग करणार आहे. औषधाचे नाव आणि किंमत निश्चित केली गेली आहे. २ डीजीटीएम नावाने हे औषध एका सॅचे साठी ९९० रुपये किंमतीला विकले जाणार आहे. यामुळे खुल्या बाजारात हे औषध उपलब्ध होणार आहे.

डीआरडीओने या औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळविली होती. करोना संक्रमणाशी लढण्यास हे औषध खुपच प्रभावी ठरले आहे. या औषधाला २ डीजी नाव दिले गेले होते. ड्रग कंट्रोलर कडून या औषधाला हिरवा कंदील दाखविला गेला आहे. आता या औषधाचे व्यावसायिक पातळीवर डॉ. रेड्डीज कडून उत्पादन आणि विक्री केली जाणार आहे.

हे औषध सुरवातीला महानगरे आणि मोठ्या शहरात उपलब्ध केले जाईल आणि नंतर देशाच्या सर्व भागात ते मिळणार आहे. हे औषध ९९.५ टक्के शुध्द स्वरुपात असून सरकारी संस्थांना ते सबसिडी दरात मिळू शकेल असे समजते. हे औषध डीआरडीओच्या मदतीने इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिनने तयार केले होते.

मध्यम ते गंभीर स्वरुपाची करोना लक्षणे असलेल्या रुग्णांना या औषधाचा चांगला फायदा दिसून आला आहे. पावडर स्वरुपात असलेले हे औषध पाण्यात मिसळून प्यायचे आहे. यामुळे रुग्णाची ऑक्सिजन पातळी फार घसरत नाही आणि रुग्णाला ऑक्सिजन देण्याची गरज कमी होते.