कोविन प्रणालीत ५० देशांनी दाखविला रस

देशातील करोना लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी बनविल्या गेलेल्या कोविन प्रणालीत जगातील सुमारे ५० हून अधिक देशांनी रस दाखविला असल्याचे समजते. पंतप्रधान मोदी यांनी कोविन ओपन सोर्स सोफ्टवेअर प्रणाली ज्या देशांना हवीय त्यांना ती मोफत देण्याचे आदेश जारी केले आहेत.

या विषयी कोविन १९ लसीकरण मोहिमेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा दुसऱ्या लोकस्वास्थ्य शिखर संमेलनात बोलत असताना म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी अगोदरच सोफ्टवेअर ओपन सोर्स नमुना तयार करण्याचा आदेश दिला होता आणि ज्या कुठल्या देशाला त्याची गरज असेल त्यांना तो मोफत उपलब्ध करून द्यावा असे सुचविले होते. कॅनडा, मेक्सिको, पनामा, नायजेरिया, पेरू, अझरबैजन, युक्रेन, युगांडा, व्हिएतनाम, इराक, डोमिनिक गणराज्य, युएई सह सुमारे ५० देशांनी कोविन कार्यप्रणाली मध्ये रस दाखविला आहे. जगभरात स्वास्थ्य आणि तंत्रज्ञान तज्ञ ५ जुलै रोजी डिजिटली आयोजित होणाऱ्या वैश्विक संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यावेळी भारतात या प्रणालीने कसे काम केले याचे स्पष्टीकरण केले जाणार आहे.

पाच महिन्यात कोविनमुळे ३० कोटी पेक्षा अधिक नोंदणी, लसीकरण सांभाळण्यास ही प्रणाली सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. १.३ अब्ज नागरिकांचे लसीकरण ही सोपी गोष्ट नाही. कोविन मुळे भारताची मोठी डिजिटल प्रणाली विकसित करण्याची क्षमता सिध्द झाल्याचेही यावेळी डॉ. शर्मा यांनी नमूद केले.