ट्विटरने घातला पुन्हा एकदा घोळ; जम्मू-काश्मीर आणि लडाख दाखवले भारतापासून वेगळे!


नवी दिल्ली – मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने पुन्हा एकदा एक घोळ घातला आहे. आधीच ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात तणावाचे वातावरण आहे आणि आता ट्विटरच्या अडचणीत आणखी वाढू होऊ शकते. ट्विटरच्या संकेतस्थळावरील भारताच्या नकाशावर छेडछाड केली गेली आहे. आपल्या वेबसाइटवर ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना स्वतंत्र देश म्हणून दाखवले आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाखचा ट्विटरच्या करिअर पेजवरील दाखवल्या गेलेल्या भारताच्या नकाशामध्ये समावेश नाही, म्हणजेच तो भारताच्या सीमेबाहेर दाखवला आहे. ट्विटरच्या नकाशावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. पण याबाबत ट्विटरकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

आता या प्रकरणाची दखल भारत सरकारनेही घेतली आहे. यासंदर्भात बरीच तथ्ये सरकार संकलित करीत आहे, जसे की नकाशामध्ये हा बदल कधी झाला, वेबसाइटवर हा नकाशा कधी ठेवला गेला आणि नकाशामधील बदलामागील हेतू काय आहे. ट्विटरवर हा नकाशा देणारे लोक कोण आहेत, कोणी हा नकाशा लावला आहे? अशा अनेक गोष्टींबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे त्यामुळे आता सरकारतर्फे ट्विटरवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

जगाचा नकाशा ट्विटरच्या करिअर पेजवरील ट्वीप लाइफ विभागात आहे. येथून कंपनी ट्विटर टीम जगात कोठे आहे, हे दाखवते. या नकाशामध्ये भारत देखील आहे परंतु भारताचा नकाशा विवादित म्हणून दर्शविला गेला आहे. लडाखचा भाग याआधीही भारताचा भाग म्हणून दाखविला गेला नव्हता. पण, नंतर ती चूक दुरुस्त करण्यात आली.

सध्या ट्विटरला भारत सरकार उघडपणे विरोध करत आहे आणि केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरची भारताबद्दल दुटप्पी वृत्ती असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता ही बाब अधिक गंभीर होऊ शकते. ट्विटरचा हेतू योग्य वाटत नसल्याचेही रवीशंकर प्रसाद यांनी आधी म्हटले होते.

ट्विटरने याआधी देखील १२ नोव्हेंबर रोजी एका नकाशाद्वारे भारतातील लडाखचा भूभाग हा चीनच्या हद्दीत दाखवला होता. ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या नकाशावर भारताने आक्षेप घेतला होता. याची दखल घेत ट्विटरने आपल्या या चुकीबद्दल माफी मागितली होती. तसेच येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ही चूक सुधारणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.