युरोपात ‘कोव्हिशिल्ड’ घेतलेल्यांनाही जाता येणार; पुनावालांनी दिला शब्द


पुणे – प्रत्येक देशाने कोरोना काळानंतर लसीकरणावर भर दिला असून, लसीकरण झालेल्या परदेशी नागरिकांनाच प्रवेश देण्याकडेही लक्ष दिले जात असल्यामुळे परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय नागरिकही लसीकरण करून घेत आहेत. पण, युरोपियन युनियनमधील देशांमध्ये जाण्यात कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना मोठा अडथळा निर्माण झाला. कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश न देण्याचा निर्णय युरोपियन युनियनने घेतल्यामुळे कोव्हिशिल्ड घेतलेल्यांचे युरोपियन देशात जाण्याचे मार्गच बंद झाले आहेत. यात आता लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी ट्विट करून कोव्हिशिल्ड घेतलेल्या नागरिकांना शब्द दिला आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशिल्ड ही लस असून, भारतातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तिचे उत्पादन केले जात आहे. पण, कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश न देण्याचा निर्णय युरोपियन युनियनने घेतलेला असून, समस्या निर्माण झाली आहे. या मुद्द्यावर अदर पुनावाला यांनी ट्विट करत अडथळा दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

मला याची पूर्णपणे जाणीव आहे की, कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या असंख्य भारतीयांना युरोपियन देशात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण मी सर्वांना ग्वाही देतो की, हा मुद्दा मी उच्च स्तरावर मांडला आहे. आशा आहे की, हा मुद्दा लवकरच निकाली निघेल, नियामक आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर मार्ग निघेल, असे पुनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आतापर्यंत युरोपियन युनियनने भारतात तयार केल्या जात असलेल्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता दिलेली नाही. वॅक्सझेवरिया आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लसी ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या आहेत. पण, यातील वॅक्सजेवरियालाच मान्यता देण्यात आलेली आहे. युरोपियन मेडिकल एजन्सीने चार डोसच्या लसीला मंजूरी दिलेली आहे. ही लस घेतलेल्यांनाच युरोपियन देशात प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.