युएईत खेळवली जाणार यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा – बीसीसीआय


नवी दिल्ली – यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाणार नाही. याबाबतची अंतिम घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी केली असून ते म्हणाले, भारतात होणाऱ्या २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेला आम्ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवत आहोत. आज आम्ही या संदर्भात आयसीसीला माहिती देणार आहोत. टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसी ठरवेल.

यासंदर्भात ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजाहमध्ये विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवले जातील. कोरोनामुळे आयपीएल २०२१ची उर्वरित स्पर्धाही यूएईत खेळवण्यात येणार आहे.या स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबरला असणार आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार आहे.

ईएसपीएनच्या वृत्तानुसार टी-२० विश्वचषक स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये खेळवली जाईल. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. तसेच राऊंड १ मध्ये १२ सामने होणार असून त्यामध्ये ८ संघ आमने सामने येणारे आहेत. ८ पैकी ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. सुपर १२ साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे.

त्याचबरोबर सुपर १२ फेरीत एकूण ३० सामने होणार आहेत. २४ ऑक्टोबरपासून ही फेरी सुरू होईल. सुपर १२ फेरीत ६-६ संघांना दोन स्वतंत्र गटात विभागले जाईल. सुपर १२ नंतर ३ प्लेऑफ सामने, २ उपांत्य फेरी आणि त्यानंतर अंतिम सामना होईल.