ईगतपुरीमधील हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह 22 जण अटकेत


नाशिक : नाशिक पोलिसांनी इगतपुरीमधील हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी मराठी बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री हिना पांचाळसह 22 जणांना अटक केली आहे. यात परदेशी महिलेसह बारा महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे. या सगळ्यांच्या रक्ताचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणी ड्रग्स आणि इतर पदार्थांचे सेवन केले होते ते स्पष्ट होईल.

इगतपुरीमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर रविवारी (27 जून) पहाटे नाशिक पोलिसांनी छापा टाकत एकूण 22 जणांना बेड्या ठोकल्या. यात मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह दक्षिण आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील काहींचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी घटनास्थळावरुन ड्रग्स आणि इतर साहित्यही ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातही ड्रग्सचे मुंबई कनेक्शन समोर आले असून इगतपुरी हा रेव्ह पार्टीचा अड्डा बनला आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शनिवारी रात्री इगतपुरीतील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिलावर पार्टी सुरु होती ज्यात 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांचा समावेश होता. नाशिक ग्रामीण पोलिसांना रविवारी पहाटे याबाबत टिप मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पथकासह येथे छापा टाकला. यावेळी काही महिला आणि पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी अनेकांनी साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे, काही जण कोरिओग्राफर आहेत, तर एक महिला ही परदेशी नागरिक आहे.

या सर्व 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून दारुच्या बाटल्या, हुक्का, कॅमेरा, ट्रायपॉड आणि इतर साहित्य हस्तगत केले. धक्कादायक म्हणजे या पार्टीत कोकेनसह इतर दोन ड्रग्सचाही वापर केला जात होता. या रेव्ह पार्टीत चित्रपटसृष्टीशी संबंधित महिला तर होत्याच पण येथे ड्रग्सही आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ड्रग्ज पुरवल्याच्या संशयातून एका नायजेरियन नागरिकाला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे ड्रग्सचे मुंबई कनेक्शन या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आले आहे.

पोलिसांनी या रेव्ह पार्टी प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल केला आहे. मात्र या पार्टीचे आयोजक कोण होते? अजून कोण कोण या पार्टीशी संबंधित आहेत? नायजेरियन नागरिकाने ड्रग्ज आणले कुठून? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. दरवर्षी इगतपुरीत अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्यामुळे इगतपुरी हा रेव्ह पार्टीचा अड्डा बनला आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.